अ.नगर- येथील बालरंगभूमीला समर्पित आणि सतत 25 वर्ष बालकलाकारांना घडविणारी राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धा म्हणजे कांकरिया करंडक. अगदी कोरोना काळात ही सदर स्पर्धा ऑनलाईन घेऊन त्याची अखंडता जपण्यात आली आणि यंदाचे हे 25 वे वर्ष. मानकन्हैय्या ट्रस्ट आणि मराठवाडा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्व कन्हैय्यालालजी कांकरिया (निवृत्त न्यायाधीश) यांच्या स्मरणार्थ सदर स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाच्या या रौप्यमहोत्सवी वर्षाची जोरदार तयारी सुरू असून त्या विषयी जनमाणसामध्ये उत्सुकता व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दर वर्षी बालकलाकार या स्पर्धेची आतुरतेने वाट पहात असतात.

यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात राज्यभरातून 25 एकांकिकांनी प्रवेश घेतला आहे. सदर स्पर्धेत अंबाजोगाई, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, डोंबिवली, सोलापूर, अकोले, राहुरी सहित अनेक जिल्हयातुन आलेले बालकलाकार आपली कला कांकरिया करंडक रंगमंचावर सादर करणार आहेत. यंदाच्या वर्षी 30,31 डिसेंबर 2022 तसेच 1 जानेवारी 2023 रोजी माऊली संकुल सभागृह, झोपडी कॅन्टीन जवळ, अहमदनगर येथे या स्पर्धा संपन्न होतील. स्पर्धेचे उद्घाटन झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठ मधील परी बालकलाकार मायरा वयकुल हिच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी श्री प्रकाश पारखी अध्यक्ष अखिल भारतीय बालरंगभूमी परिषद असतील. कांकरिया करंडक स्पर्धेचे पारितोषिक वितरण 1 जानेवारी 2023 रोजी सुप्रसिध्द चित्रपट अभिनेत्री व लेखिका डॉ निशिगंधा वाड यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून बालकलाकार आरूष बेडेकर झी मराठी वरील योगयोगेश्वर जय शंकर मधील शंकर महाराज फेम कलाकार उपस्थित राहणार आहेत.

गेल्या 25 वर्षात कांकरिया करंडकच्या रंगमंचा वरून 500 पेक्षा जास्त संघ, 8 हजारपेक्षा अधिक बालकलाकार सहभागी झाले. अनेक परिक्षक यानिमित्ताने स्नेह धाग्यात गुंफले गेले. अनेक मान्यवर पाहुण्यांचे-तज्ञांचे आशिर्वाद, मार्गदर्शन लाभले. हजारो प्रेक्षकांना अलौकिक असा आनंद प्राप्त झाला. कलेच्या या अभिव्यक्तीमुळे अनेक अनेक बालकलाकार घडत गेले. एकांकिका ते चित्रपट, अभिनय ते दिग्दर्शन असा ही काहींचा प्रवास झाला. जय मल्हारचा रोहित देशमुख, अल्टी पल्टी मधील चैतन्य सरदेशपांडे लेखक व दिग्दर्शक, अग बाई अरेच्चा मधील गौरवी जोशी, श्वास चित्रपटातील अश्विन चितळे, निर्माता, अभिनेता, लाईन प्रोडूयसर स्वप्निल मुनोत, भाग्य दिले तू मला सिरीयल मधील अमीत रेखी, नॅशनल अवॉर्डेड शॉर्ट फिल्म कुंकुमार्चन निर्माता पुष्कर तांबोळी, दे धक्का मधील सक्षम कुलकर्णी, सुप्रसिध्द गायिका प्रियांका बर्वे, चित्रपट निर्माता दिग्दर्शक द्विक्पाल लांडेकर, दिग्दर्शक व अभिनेता सुरज पारसनीस, अभिनेता व लेखक ओंकार गोखले, टि व्हि मालिकाचा पटकथा लेखक शार्दूल सराफ, झी युवा वरील तुझ माझ जमतंय मालिकेतील वैष्णवी घोडके असे अनेक हिरे कांकरिया करंडकाने नाटय-चित्रपट सृष्टिला बहाल केले.
मराठी बाल रंगभूमीचा बालरंगभूमी हा पाया आहे. महाराष्ट्राची मराठी बालरंगभूमी अधिक समृध्द व्हावी म्हणून बालनाटय चळवळीला गती देण्याचे कार्य कांकरिया करंडकाने केले. नाटयसंस्कार, ज्ञान, विचार, दूरदृष्टी आणि सेवाभाव या पंचमार्गावरून चाललेली कांकरिया करंडक राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धा ही अहमदनगर शहराला महाराष्ट्राला आणि बालरंगभूमीला नक्कीच भूषणावह ठरली आहे. राज्यस्तरावर कार्य करणारी व बालरंगभूमीला समर्पित तसेच अखंड 25 वर्षे कार्य करणारी कांकरिया करंडक ही एकमेव स्पर्धा आहे.
26/12/1997 रोजी कांकरिया करंडक स्पर्धा सुरू झाली. त्याचा शुभारंभ जेष्ठ रंगकर्मी, वर्हाडकर आदरणीय डॉ. लक्ष्मण देशपांडे तसेच जेष्ठ पत्रकार नागनाथजी फटाले यांच्या हस्ते झाली. सदर प्रसंगी श्री अरूण फिरोदिया (उद्योगपती) आणि श्रीनिवास भणगे (सुप्रसिध्द चित्रपट कथालेखक) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पहिल्याच वर्षी उदंड प्रतिसाद मिळाला. मुलांची ती मोहक किलबिल, त्यांच्या उत्साह ओसांडून वाहणारा आनंद, एकांकिका सादर करण्याविषयीची उत्सुकता पाहुन आयोजक म्हणुन आम्ही सुखावलो. मुलांबरोबर आम्ही ही मुले झालो. हरवलेले आमचे बालपण परत मिळाले आणि अधिक जोमाने आम्ही कामाला लागलो. दर वर्षी अनेक जेष्ठ – श्रेष्ठ नाटयकर्मी-चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. मुलांना मागदर्शन केले. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली त्यात श्री द मा मिरासदार (अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलन), श्री चंद्रकांत कुलकर्णी, प्रा जयंत तारे (बाल नाटय चळवळीचे जेष्ठ अभ्यासक), सौ आशालता वाबगावकर (सिनेअभिनेत्री), मकरंद अनासपुरे, डॉ. निशिगंधा वाड (सिनेअभिनेत्री), श्री विश्वासराव नांगरे पाटील (जिल्हा पोलिस अधिक्षक), श्री चित्तरंजन कोल्हटकर (जेष्ठ रंगकर्मी), श्री दत्ताजी भगत (अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलन), अतूल तोडणकर (अभिनेता), श्रुती कार्लेकर, श्री महेश सावंत, नाटय क्षेत्रातील थोर व्यक्ती श्री कमलाकर सोनटक्के, सौ कांचन सोनटक्के, विणा लोकुर, टिव्हि स्टार मोहिनीराज गटणे आणि अनेक जेष्ठ श्रेष्ठ कलाकारांनी उपस्थित राहुन बालकलाकारांचे कौतुक केले, मार्गदर्शन केले.
यंदाचे 25 वे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असतांना कांकरिया करंडक संयोजन समितीच्या वतीने अहमदनगर शहरातील जेष्ठ श्रेष्ठ रंगकर्मी ज्यांनी नाटय-चित्रपट क्षेत्रात मौलिक योगदान दिलेले आहे अशा थोर व्यक्तींचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन यथायोग्य सत्कार करण्यात आला. त्यांना ‘गौरव रंगभूमीचा’ हा सन्मान आदर पुर्वक बहाल करण्यात आला. त्यांच्या ऋषीतुल्य योगदानामुळेच नगरची नाटय संस्कृती बहरली, कला संस्कृती विस्तारीत गेली त्यांचे अनंत उपकार समाजावर आहेत त्यांना अभिवादन करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो अशी त्यामागची भावना होती. त्यामध्ये स्व. शाहू मोडक, श्री मधुसुदन मुळे, श्री श्रीकांत बेडेकर, श्री अविनाश बेडेकर, डॉ. मुकुंद देवळालीकर, स्व अॅड सतिष भोपे, स्व अनिल तथा बालिकाका क्षीरसागर, स्व सदाशिव अमरापूरकर, स्व शाहू मोडक, श्री मोहन सैद, श्री आयुब खान, श्री मकरंद खेर, श्री सदानंद भणगे, श्री पी डी कुलकर्णी, शांतिकुमार फिरोदिया मेमोरीयल फाऊंडेशन आणि पुढील टप्यात अहमदनगर जिल्हयातील नाटयसंस्था व नाटय कलाकारांचाही यथोचित सत्कार करण्यात येईल अशीही भावना व्यक्त करण्यात आली.
कांकरिया करंडकाच्या 25 वर्षे घेण्यात आलेल्या कांकरिया करंडकाच्या 25 वर्षे अर्थात दोन तपाच्या यशस्वी तपस्याचे मानकरी आहेत कांकरिया करंडकाच्या स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया तसेच मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश व कार्याध्यक्ष डॉ. वर्धमान कांकरिया, सचिव श्री सदाशिव मोहिते, श्री उमाकांत जांभळे, श्री सुभाष बागुल, श्री दत्ता इंगळे, मोईनुद्दिन ईनामदार, श्री सौदागर मोहिते, कु प्रिया सोनटक्के, प्राची जांभळे, श्री शशिकांत नजान, स्वप्निल मुनोत, श्री नंदकुमार देशपांडे, श्री गणपत लोखंडे, सौ वर्षा लोखंडे, श्री पुरूषोत्तम दरबस्तवार, वैशाली धांडे, स्मिरा कांकरिया, श्री रामदास केदार, श्री दिपक शिरसूल, श्री प्रसाद बेडेकर, श्री गौरव कुलकर्णी, डॉ. बागले सुभाष, श्री मनोहर कटके, सौ सिंधू कटके, श्री रमेश बाफना, सौ गौरी जोशी, डॉ. विजय जोशी, सौ अश्विनी शेट्टी, सौ अर्चना चौधरी, सौ विजया मोहिते, सौ उर्मिला जांभळे, श्री सुरेश क्षीरसागर, श्री रमेशचंद्र छाजेड, सौ रत्नप्रभा छाजेड, श्री सचिन तुपे, श्री किरण कांकरिया. यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष अत्यंत दिमाखदार साजरा करण्यासाठी संपूर्ण कांकरिया करंडकचा परिवार सज्ज झाला आहे.










