आ. निलेश लंके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे, त्यांच्या या उपोषणाला राष्ट्रवादी तथा अन्य अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, यांनी समर्थन दर्शविले. जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरूस्तीच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या आमदार नीलेश लंके यांचे वजन तिसऱ्या दिवशी तीन किलोने घटले, त्यांना अशक्तपणा जाणवत असून कार्यकत्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकान्यांनी आ. लंके यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली, मात्र ठोस निर्णय देणार असाल तरच चर्चेला या अशी भूमिका आ. लंके यांनी घेतल्याने या आंदोलनातील पेच तिसऱ्या दिवशीही ठाम राहिला.
आ. लंके यांनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर या भाजपा वगळता सर्वपक्षीयांचा आंदोलनास पाठींबा मिळाला. शुक्रवारीही विविध पक्षाचे संघटनांचे प्रतिनिधी आंदोलन स्थळी येऊन आ. लंके यांना पाठींबा दर्शवित होते. दरम्यान आंदोलाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, सुपा तसेच पाथर्डी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पारनेर तालुक्यात आंदोलकांना नोटीस बजावण्यात आल्या. टाकळी ढोकेश्वर येथील आंदोलन चिरडण्याचा पोलिसांकडून प्रयत्न झाला.
परंतू आंदोलकांनी ठाम भूमिका घेत रस्त्यावरच ठाण मांडल्याने अर्धा तास आंदोलन करण्यात येऊन प्रशासनास निवेदन देण्यात आले. तेथील १५ कार्यकर्त्याना नोटीस बजावल्या. सुपा येथे नगर-पुणे महामार्ग रोखण्यात येऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. शेकडो बळी जाऊनही प्रशासन या प्रश्नावर गंभीर नाही. या रस्त्यांवरील अपघातांमध्ये शेकडो नागरीकांना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. चार वर्षात ३८ ते ४० आंदोलने झाली परंतू काहीही फरक पडला नाही.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज ( ०९ डिसेंबर ) रोजी जिल्हाधिकारी भोसले यांनी आ. निलेश लंके यांची भेट घेऊन त्यांना हे उपोषण मागे घेण्याची विनंती केली तसेच सदरील रस्त्याची कामे उद्या पासून चालू होतील असे आश्वासन दिले. यावेळी त्या ठिकाणी आ. रोहित पवार तसेच आ. प्राजक्त तनपुरे देखील उपस्थित होते. पण यावेळी आ. निलेश लंके म्हणाले कि, ” स्वतः कलेक्टर माझी चौकशी करण्यासाठी आणि उपोषण संपवावे यासाठी आले पण जोपर्यंत मला लेखी आश्वासन मिळत नाही आणि जोपर्यंत प्रत्यक्षात काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. जर दिलेल्या शब्दानुसार उद्या दुपार पर्यंत काम चालू झाल तर मी हे उपोषण मागे घेईल. “
यावेळी जिल्हाधिकारी यांनी लेखी देण्याची तयारी दर्शवली असून उद्यापासून सर्व यंत्रणा या कामाला लागणार आहे असे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर पाहूया उद्या रस्त्याचे काम चालू होईल कि नाही आणि आ. निलेश लंके उद्या उपोषण सोडतील कि नाही.










