शिर्डी (प्रतिनिधी)
उद्धव ठाकरे हे नेवासा येथील ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. प्रथम त्यांनी शनिशिंगणापूरला जाऊन श्री. शनि महाराजांचा अभिषेक करत श्री शनि महाराजांचे दर्शन घेतले. माजी खासदार यशवंतराव गडाख यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या घरी भेट देऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. त्यानंतर उद्धवजी ठाकरे हे शिर्डीला आले. श्री साई समाधी मंदिरात जाऊन त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. श्री साई संस्थानच्या वतीने उद्धवजी ठाकरे व सौ रेश्मीताई ठाकरे यांचा साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी त्यांचा शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव हे उपस्थित होते. शिर्डीत उद्धव ठाकरे यांचे आगमन होताच शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. ठिकठिकाणी उद्धवजी ठाकरे यांच्या स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. शिवसैनिक ,साईभक्त व ग्रामस्थांनी उद्धवजी ठाकरे यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी मंदिर परिसराबाहेर केली होती. उद्धवजी ठाकरे शिर्डीत येणार त्यामुळे येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त शिर्डीत सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता.










