प्रतिनिधी वजीर शेख
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: |
*यत्र एता: तु न पूज्यन्ते सर्वा: तत्र अफला: क्रिया: ||
अर्थात
जेथे स्त्रियांचा आदर राखला जातो, तेथे देवता रममाण होऊन वास करतात. याउलट जेथे स्त्रियांना मान दिला जात नाही, तेथे सर्व कार्ये निष्फळ होतात,असे प्रतिपादन डॉक्टर शेषराव पवार यांनी केले.
श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पवार सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “स्त्री -काल ,आज आणि उद्या” यावर प्रकाश टाकला. कालही स्त्री संघर्ष करत होती, आजही ती संघर्ष करताना दिसते. परंतु या संघर्षाचे स्वरूप बदललेले आहे. आज ती संघर्ष करते आहे शिक्षण घेण्यासाठी, नोकरी करण्यासाठी आणि आजच्या या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी. आजची स्त्री ही विविध क्षेत्रात कार्यरत दिसते .स्काय इज द लिमिट हे म्हटले तर खोटे ठरणार नाही. अगदी स्वयंपाक घरापासून ते अवकाशापर्यंत ची सर्वच क्षेत्रे तिच्यासाठी खुली आहेत आणि या क्षेत्रांमध्ये ती यशस्वीरित्या भरारी घेत आहे. कल्पना चावला सुनीता विल्यम्स ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पर्यंत कितीतरी उदाहरणे देता येतील. यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी आपले करिअर उज्वल करावे ,ही अपेक्षा याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका मनीषा सानप यांनी केले ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात का साजरा केला जातो ,याची पार्श्वभूमी त्यांनी विद्यार्थिनींना सांगितली. मानवाची प्रगती महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय अपूर्ण आहे .आज जगभर ,भारतभर जागतिक महिला दिन साजरा होत आहे .असे कार्यक्रम महिला सबलीकरणाची गरज अधोरेखित करतात .परंतु याचे महत्त्व केवळ एका दिवसाच्या प्रतीकात्मकते पुरते मर्यादित असू शकत नाही. स्त्री सशक्तिकरण ,स्त्री सबलीकरण यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही आपण लिंगभेद आणि स्त्रीभ्रूणहत्येची घृणास्पद प्रथा संपविण्याच्या बाबतीत बोलत आहोत ,ही गोष्ट दुर्दैवी आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ ज्योती शर्मा संचालिका,तिरुपती बालाजी को-ऑपरेटिव्ह बँक पाथर्डी, या मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थिनींना स्त्रीनेच स्त्रीला प्रोत्साहन हे दिले पाहिजे असे सांगितले. काम करताना कोणतेही काम हे छोटे-मोठे नसते .त्यात मन लावून काम केले तर त्या कामाचे कौतुक होते. आयुष्यामध्ये संकटे हे येतच असतात. परंतु त्यावर मात करून आपण पुढे जायचे असते. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत असताना त्यांनी त्या एक यशस्वी उद्योजिका कशा झाल्या, बँकेत काम करत असताना आपणच का एखादी बँक उभारू नये हे स्वप्न त्यांनी पाहिले आणि ते साकारही केले. आज पाथर्डी सारख्या शहरामध्ये एक यशस्वी उद्योजिका म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्या म्हणाल्या की हा प्रवास माझ्यासाठी नक्कीच सुकर नव्हता. परंतु सर्वांच्या सहकार्याने मी इथपर्यंत मजल मारली. आयुष्यात ध्येय गाठायचे असेल तर कधीही हार मानू नका हा, मोलाचा सल्ला ज्योती यांनी विद्यार्थ्यांनीना दिला. दरवर्षी महिला दिन हा एक थीम घेऊन साजरा केला जातो यावर्षीसाठी संयुक्त राष्ट्रांची थीम डिजिटल ऑल संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी अशी आहे या फिल्मचा उद्देश आहे जगभरात ज्या महिला आणि मुली तंत्रज्ञान आणि ऑनलाइन शिक्षणात जे योगदान देत आहेत ते ओळखून त्यांचा यथोचित सन्मान करावा. यंदा या निमित्ताने डिजिटल लिंग असमानतेमुळे महिला आणि मुलींच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हेही शोधण्याचा प्रयत्न असेल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयश्री खेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अनिता पावसे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.अश्विनी थोरात ,डॉ. बथवेल पगारे, प्रा. सूर्यकांत काळोखे व महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.










