नेवासा प्रतिनिधी :- शिर्डी लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून तो काँग्रेसलाच मिळावा व काँग्रेसचे राजेंद्र वाघमारे यांना या मतदार संघातून पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी असे साकडे आज जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांना घालण्यात आले.
मुंबई येथील काँग्रेस टिळक भवन कार्यालय याठिकाणी आगामी लोकसभा निवडणुका, पक्ष संघठन आढावा तसेच संविधान सुरक्षा अशा अनेक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, काँग्रेसचे राष्ट्रिय नेते मुकुल वासनिक, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तींबिरे यांनी बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अहमदनगर जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्यावतीने शिर्डी लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसला मिळावा व या मतदार संघातून अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदरपणे मागणी करण्यात आली. याआगोदर काँग्रेसने दिलेले आयात उमेदवार पक्षाशी गद्दारी करत भाजपमध्ये गेले त्यामुळे आयात उमेदवार न देता यावेळी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यालाच पक्षाने उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसलाच राहील वेळ पडल्यास काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणुका लढेल असेही स्पष्ट केले. तसेच कोणतीही वाट न बघता काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे असा सूचक सल्ला देखिल दिला. यावेळी वाघमारे यांना शिर्डी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी असे लेखी निवेदन अनुसूचित जाती विभागाकडून प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना देण्यात आले. यावेळी अनुसूचित जाती विभाग प्रदेश कमिटीचे बंटी यादव, संजय भोसले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे,कार्याध्यक्ष संतोष गायकवाड नेवासा काँग्रेसचे संभाजी माळवदे, सचिन बोर्डे, संदीप मोटे, किरण साठे, आदीसह जिल्हाभरातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.










