श्रीरामपूर : नेवासा येथे ४० हजार रुपये किमतीचे जनरेटर चोरून श्रीरामपूरच्या भंगारवाल्याकडे विक्रीस नेताना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चार आरोपींना श्रीरामपूर येथील दत्तनगर ” सूतगिरणी जवळ, सापळा रचून – पकडले. या कारवाईत टेम्पो व जनरेटरसह २ लाख २० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
नेवासा येथील जनरेटर दुकानदार औरंगजेब रबाजी शेख यांच्या दुकानातील डिझेल इंजिन असलेले हिरव्या रंगाचे २० हजार किमतीचे दोन जनरेटर चोरीस गेले होते. नेवासा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेवासा परिसरात रात्रीची गस्त घालताना पोलिस निरीक्षक कटके यांना काही व्यक्ती चोरी केलेले जनरेटर दत्तनगर रोड, श्रीरामपूर सूतगिरणी जवळ, बबलू शाह यांच्या भंगार दुकानात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे सूतगिरणी रोडवर सापळा रचला व तपासणी करताना काळ्या रंगाचा ताडपत्री लावलेला टेम्पो न्यू मदार स्क्रॅप सेंटरमध्ये जाताना दिसला. दुकानाच्या आडोशाला पथकातील अंमलदाराने खात्री केली, चार-पाच व्यक्ती टेम्पोमधील जनरेटर खाली उतरताना दिसले. त्यावेळी अचानक छापा टाकला.
यावेळी टेम्पोजवळ उभा असलेला एकजण रेल्वे पटरीकडे पळत जाऊन पसार झाला. नाजीम अन्वर पठाण (वय २२), आकाश चंपालाल गायकवाड (२०), भारत गोकुळ गांगुर्डे (१९) व आदित्य मनोज भवार (२०, सर्व, रा. वार्ड नं. २, श्रीरामपूर) यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी साथीदारासह नेवासा येथे जनरेटर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपीविरुद्ध श्रीरामपूर शहर, राहुरी, आश्वी व नेवासा पोलिस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना नेवासा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.









