नेवासा – नेवासा फाटा येथील गुरुवारच्या आठवडे बाजारातून मोबाईल चोरीच्या घटना सातत्यानेच घडत असून वकिल – डॉक्टर यांच्यासह अनेक व्यावसायिकांचे मोबाईल चोरी होत असल्याच्या वारंवार घडत असतांना याबाबत नेवासा पोलीसांना याची माहितीही अनेकदा देण्यात आली माञ पोलीसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज गुरुवार (दि.५) रोजीच्या आठवडे बाजारात बाजार करत असणाऱ्या एका पोलीस उपनिरिक्षकांच्या मोबाईलवरच चोरट्यांनी डल्ला मारला.
उपनिरिक्षक हे आठवडे बाजारात मुळा खरेदी करतांना मुळ्याच्या भावाचा सौदा करत होते १० रुपयात तीन मुळे विक्री करणारा सांगत होता तर उपनिरिक्षक साहेब पाच रुपयाचे तीन मुळे द्या असे सांगून सौद्यात सुत जमवत असतांनाच सराईत मोबाईल चोरांनी पोलीस उपनिरिक्षकांचीच हात की सफाई केल्यामुळे पोलीस दलात चांगलेच चर्चेचे काहूर माजले आहे.
गुरुवारच्या आठवडे बाजारात दर गुरुवारी अनेकदा वकिल,डॉक्टर,व्यापारी,सरपंच यांचे कित्येकदा मोबाईल चोरी देखील झालेले आहेत याबाबत वारंवार पोलीसांकडे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही केली गेलेली होती माञ नेवासा पोलीसांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज चक्क बाजार करतांना पोलीस उपनिरिक्षकांच्याच मोबाईलवर डल्ला मारल्यामुळे बाजारातही लोकांना हसू आवरता आले नाही आणि पोलीस ठाण्यातही ही वार्ता पसरल्यामुळे चांगलीच मोबाईल चोरीची चर्चा रंगली जात आहे.









