बॉल बॅडमिटन स्पर्धेत देवळाली प्रवरा मुलींचा संघ तर जामखेड महाविद्यालयाचा मुलांचा संघ विजेता.
जामखेड: दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे जामखेड महाविद्यालय, जामखेड येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन बॉलबॅडमिंटन क्रीडा स्पर्धांचे आयोजन २४ डिसेंबर रोजी करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन समारंभपूर्वक करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अशोकशेठ शिंगवी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू मा.सकलेन सय्यद यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. अरुणशेठ चिंतामणी, सचिव मा. शशिकांत देशमुख, खजिनदार मा.राजेशजी मोरे, तसेच अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाचे सचिव मा. डॉ. रोहित आदलिंगे, विविध महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक यावेळी उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाचे वतीने प्राचार्य डॉ. एम.एल. डोंगरे यांनी स्वागत करुन सन्मान केला. यानंतर मनोगतांमध्ये प्रमुख पाहुणे सकलेन सय्यद यांनी “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुध्दा कष्ट आणि जिद्दीच्या बळावर नक्कीच यशस्वी होता येते. तसे यश तुम्ही सर्वांनी मिळवावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.” यावेळी संस्थेचे सचिव मा. शशिकांत देशमुख यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अशोकशेठ शिंगवी यांनी सर्व खेळाडूंनी आपल्या महाविद्यालयांचे नावलौकिक वाढवण्यासाठी योगदान द्यावे अशा सदिच्छा दिल्या. शेवटी प्रा. ऋषिकेश देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन तरटे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी, खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
उद्घाटन समारंभानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. यासाठी तीन मैदान तयार करण्यात आली होती. स्पर्धेसाठी मुलींचे ६ संघ, तर मुलांचे ११ संघ सहभागी झाले होते. यामध्ये मुलींमध्ये छ.शाहू कॉलेज देवळाली प्रवरा विजेता ठरला तर उपविजेतेपद राहुरी महाविद्यालयाने पटकावले. यजमान जामखेड महाविद्यालयाचा मुलींचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
मुलांच्या संघामध्ये विजेतेपदासाठी कडवी झुंज पहायला मिळाली. अंतिम सामन्यात यजमान जामखेड संघ दोनही सेट जिंकून अजिंक्य ठरला तर उपविजेतेपद बेलापूर महाविद्यालयाला मिळाले. तिसरा क्रमांक राहुरी महाविद्यालयाने पटकावला.
राष्ट्रीय खेळाडू मा. नागार्जुन राळेभात, मा.पंकज पोकळे, मा. समद शेख, मा. फय्याज शेख मा. नितीन यादव यांनी परीक्षक म्हणून कामकाज पार पाडले. यासाठी मा. प्रा.मधुकर आबा राळेभात यांनी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले.
स्पर्धेचा दिवस महाविद्यालय परिसर उत्साह, उत्कंठा, जल्लोष, सुस्कारे आणि टाळ्यांनी दुमदुमून गेला होता. प्रचंड उत्साह आणि आनंदाचे अनोखे दर्शन खेळाडूंनी घडवले. यजमान जामखेड संघाची चमकदार कामगिरी प्रेक्षकांची दाद मिळवणारी होती.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. उध्दव (बापू) देशमुख व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.एल. डोंगरे , उपप्राचार्य डॉ.सुनिल नरके यांच्या नेतृत्वाखाली शारीरिक शिक्षण संचालक डॉ.आण्णा मोहिते, महाविद्यालय क्रीडा समिती, संयोजक समिती, सुकाणू समिती, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, खेळाडू यांनी उत्कृष्ट नियोजन करून परीश्रम घेतले.










