मॉडेल व्हिलेज गोरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत बाबासाहेब तांबे यांच्या पॅनलच्या सरपंच पदासह सहा ग्रामपंचायत सदस्यांचा विजय झाला. संपूर्ण तालुक्यात प्रतिष्ठेची केली गेलेली गोरेगावची ग्रामपंचायत निवडणूक सामान्य जनतेने हातात घेतलेली होती. बाबासाहेब तांबे यांची गेल्या पंचवीस वर्षांची एक हाती सत्ता मोडीत काढण्यासाठी सर्व विरोधक एकवटले होते. संपूर्ण तालुक्यात सत्तांतर होत असताना बाबासाहेबांच्या विकासाला जनतेने साथ दिली. सलग सहाव्यांदा बाबासाहेब तांबे यांनी गोरेगावची सत्ता राखली. माजी सरपंच राजाराम नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली गेली.
सौ सुमन बाबासाहेब तांबे यांनी गेली पाच वर्षे सरपंच पदाच्या कार्यकाळात शिक्षण, पर्यावरण,आरोग्य, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात तसेच कोरोना काळात अतिशय प्रभावी काम केल्यामुळे मतदार बंधू-भगिनींनी सरपंच पदाच्या विजयाची माळ पुन्हा सुमनताईंच्या गळ्यात टाकली.अण्णा पाटील नरसाळे,गणेश तांबे,अनुसया नरसाळे, स्मिता काकडे,गीताबाई शेरकर,मंदा चौरे हे सर्व उमेदवार विजयी झाले.
या निवडणुकीत महिलावर्ग आणि तरुणांनी निवडणूक हातात घेतली होती. विरोधी गटाचे पॅनल प्रमुख संभाजी नरसाळे यांचा राजकारणाशी काहीही संबंध नसणाऱ्या गणेश तांबे या तरुण युवकाने दारुण पराभव केला. या वार्डातील निवडणूक संपूर्ण तरुणांनी हातात घेतली होती. सौ सुमन तांबे यांनी विजयी सभेत बोलताना माय माऊलींचे आभार मानले. हा विजय गोरेगावच्या निवडणुकीत कष्ट घेणाऱ्या कार्यकर्त्यांना समर्पित करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.पुढील पाच वर्ष माय माऊलींना कुटुंबप्रमुख म्हणून सर्वतोपरी आधार देण्याचे आश्वासन दिले. मॉडेल व्हिलेज असणाऱ्या गोरेगाव मध्ये रस्ते, वीज, पाणी या समस्या मिटलेल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती,सेतू कार्यालयातील कामांसाठी स्वतंत्र माणसाची ग्रामपंचायत कार्यालयात नेमणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सरपंच राजाराम नरसाळे यांनी बोलताना सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. पराभूत उमेदवारांनी खचून न जाता नव्या उमेदीने प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. बाबासाहेब तांबे यांनी विजयी सभेत बोलताना आपण सत्ताधारी असताना नेहमीच संयमाने निवडणूका हाताळल्या. परंतु यावेळी खालच्या पातळीवर राजकारण केले गेले. ही आपली संस्कृती नाही,विकासाचे राजकारण केले पाहिजे, विरोधकांनी भुलथापा दिल्या, खोटी आश्वासने दिली. घराघरात भांडण लावण्याचे काम केले, सत्तेच्या लाल सेने विरोधात गेलेल्या आपल्याच गोटातील माणसांना त्यांनी खडे बोल सुनावले. बाबा तांबे जिवंत असेपर्यंत गोरेगावात मोगलाई माजू देणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी गोरेगावच्या जनतेला दिला.
आपण नेहमी विकासाचं राजकारण केलं तो पिंड आपण सोडणार नाही. गेल्या सत्तेच्या कार्यकाळात जे लोक दुखावले असतील त्यांना पुन्हा जवळ घ्या, सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा,अशा सूचना त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिल्या. पराभूत उमेदवारांनी खचून न जाता निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बरोबरीने काम करावे. गावच्या सत्तेचा उपयोग सामान्य जनतेच्या हितासाठी करावा,असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. प्रचार सभेत बोलताना त्यांनी श्री गोरेश्वर मंदिरामध्ये वक्तव्य केले होते की गोरेगावात उभे असलेल्या दोन्ही गटाच्या 24 उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते विरोधी गटाचे पॅनल प्रमुख संभाजी नरसाळे यांना पडतील, ते भाकीत खरे ठरल्याचे त्यांनी यावेळी विजयी सभेत सांगितले.
यावेळी अनिल पाटील नरसाळे, गणेश जाधव, संकेत चौरे, दीपक काकडे, बाळासाहेब नरसाळे, रामदास नरसाळे, बाळासाहेब पातारे, प्रभाकर नरसाळे सर, माजी चेअरमन शिवाजी शेरकर आदींनी यावेळी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन व आभार संदीप तांबे यांनी केले.










